Jal Jeevan Mission salary issue
गडचिरोली : शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा सल्लागार, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन हे दोन्ही उपक्रम केंद्र पुरस्कृत असून, त्यात कार्यरत कर्मचारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत. मात्र, त्यांना जुलै 2025 पासून आजपर्यंतचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्ही वेळोवेळी राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला, परंतु केंद्र सरकारकडून निधी प्राप्त न झाल्याने मानधन देणे शक्य नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसेच राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळेवर मानधन मिळाले नाही, तर दिवाळी सणाच्या काळात आमचे घर अंधारात राहील. जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावर काम करणारे हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. या मानधनातूनच घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो. त्यामुळे सध्या त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे. शासनाने या गंभीर विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून दिवाळीचा सण आनंदात जाण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.