हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबा काढण्यात आला  (Pudhari Photo)
गडचिरोली

Armori Building Collapse | आरमोरी येथे हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली, ३ जण ठार, तिघे गंभीर जखमी

Gadchiroli News | इमारत मालक व नगर पंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची शेकापची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Armori Hero showroom Building collapse

गडचिरोली: आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.८) संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

आकाश ज्ञानेश्वर बुराडे (वय २५, रा.निलज, ता.ब्रम्हपुरी), तहसीन इस्राईल शेख (वय ३०) व अफसान शेख (वय ३२, दोघेही रा.देसाईगंज) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सौरभ चौधरी (वय २५, रा. मेंडकी, विलास मने (वय ५०) व दीपक मेश्राम (वय २३, दोघेही रा. आरमोरी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरुम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरुम सुरु होती. आज तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी वा नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून, त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

इमारत मालक व नगर पंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल करा: शेकाप

आरमोरी येथील हिरो शोरुमची इमारत मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यासाठी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.

काल ७ ऑगस्टला गडचिरोलीनजीकच्या काटली येथे ट्रकने धडक दिल्याने चार विद्‌यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आरमोरीत इमारत दुर्घटनेत तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT