Bhamragad Flood Update
गडचिरोली : बुधवारी रात्रीपासून आजपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्याने २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातील सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या, तर भामरागड तालुक्यातील ७०० नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदी आणि परिसरातील नाल्यांच्या पुरात अडकून पडलेल्या एकाच कुटुंबातील केये कुडयामी (१६) आणि अक्षरा केये कुडयामी (३) या तिघांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बुधवारी रात्री सुखरूप बाहेर काढले. तसेच आज दुपारपर्यंत भामरागड तालुक्यातील ७०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरी १२३ मिलिमीटर पाऊस पडला असून, काही भागात २०० मिलिमीटरपर्यंत अतिवृ्ष्टी झाल्याचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
वनपरिक्षेत्राधिकाऱ्याला पुरातून सुरक्षित बाहेर काढले
आज मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडमचे नवनियुक्त वनपरिक्षेत्राधिकारी मोहम्मद अझरुद्दीन हे कारने आष्टीवरुन मुलचेराकडे जात असताना रेंगेवाहीजवळच्या नाल्याचा प्रवाह अचानक वाढला. कारचा काही भाग पुलाखाली घसरला आणि ते कारमध्येच अडकून पडले. लगेच त्यांनी तहसीलदार चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते आपत्ती व्यवस्थापन चमू आणि पोलिसांसह घटनास्थळी पोहचले आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना सुखरुप बाहेर काढले.
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
सकाळी साडेनऊ वाजतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून १ लाख ३५ हजार ५९२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह धरणातून ९१ हजार क्यूसेक, तर सिरोंचा तालुक्यालगतच्या तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पातून ८१ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्द व चिचडोह धरणातील विसर्ग वाढविण्यात येणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक १६३.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १६३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामरागड तालुक्यातील भामरागड मंडळात तब्बल २४१.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने तेथे पूरस्थिती निर्माण झाली. तेथील इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
पुरामुळे गडचिरोली-धानोरा, आलापल्ली-भामरागड, आष्टी-आलापल्ली,चामोर्शी-आष्टी, कुरखेडा-वैरागड, कुरखेडा-पलसगड, वैरागड-देलनवाडी, वैरागड-रांगी, कोरची-बोटेकसा, धानोरा-रांगी, एटापल्ली-कसनसूर, रोमपल्ली-झिंगानूर, एटापल्ली-गट्टा व मुलचेरा-आलापल्ली, अहेरी-देवलमरी, पोटेगाव-देवापूर-घोट, आलापल्ली-अहेरी-देवलमरी, कसनसूर-रेगडी, एटापल्ली-देवदा, आष्टी-इल्लूर, गणपूर-विठ्ठलपूर, ताडगाव-दामरंचा, व घोट-सुभाषग्राम या २४ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.