Gadchiroli Flood Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Flood: गडचिरोलीत मुसळधार पावसाचा तडाखा; भामरागडमध्ये पूर, ५२५ नागरिक सुरक्षितस्थळी

६३ गावांचा संपर्क तुटला; अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प, एसडीआरएफकडून दोन गंभीर रुग्णांची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली: जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड गावात पुराचे पाणी शिरल्याने भामरागडसह अन्य ठिकाणच्या ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून, ६३ गावांचा संपर्क तुटला आहे.

दोन दिवस छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे भामरागडनजीकच्या पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या आणि इतर नाल्यांना पूर आला असून, भामरागड-आलापल्ली, लाहेरी-भामरागड, धोडराज-नेलगुंडा, पेनगुंडा-कवंडे तसेच अन्य मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून, ६३ गावांचा संपर्क तुटला आहे.

पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील आणि अन्य ठिकाणच्या ५२५ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरु होती. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पुराचे पाणी ओसरत असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले. दोन रुग्णांना एसडीआरएफ चमूने सुरक्षितरित्या बाहेर काढले.

दरम्यान, पुरामुळे अडकलेल्या भामरागड तालुक्यातील दोन गंभीर रुग्णांना गावातून सुरक्षितरित्या बाहेर काढून दवाखान्यात पोहचविण्यात आले. होडरी येथील सैतू हबका(६५) व कुक्कामेटा येथील मालू वड्डे हे गंभीर आजारी होते. त्यांना रुग्णालयात हलविणे आवश्यक असल्याचे कळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदीच्या पुरातून सुखरुपरित्या बाहेर काढून हेमलकसा येथे पोहचवले.

त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. शिवाय बिनागुंडा येथील विनोबा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीला गुंडेनूर नाला ओलांडून सुरक्षितरित्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT