Gadchiroli Heavy Rainfall : गडचिरोलीत मुसळधार पाऊस, नद्यांना महापूर; भामरागडमधील ६३ गावांचा संपर्क तुटला

भामरागड-आलापल्ली, लाहेरी-भामरागड, धोडराज-नेलगुंडा आणि पेनगुंडा-कवंडे या प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद
Gadchiroli Heavy Rainfall : गडचिरोलीत मुसळधार पाऊस, नद्यांना महापूर; भामरागडमधील ६३ गावांचा संपर्क तुटला
Published on: 
Updated on: 

गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांत आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, भामरागड तालुक्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल ६३ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

गेल्या २४ तासांपासून तालुक्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, भामरागडनजीक वाहणाऱ्या पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांसह स्थानिक नाल्यांना मोठा पूर आला आहे. यामुळे भामरागड-आलापल्ली, लाहेरी-भामरागड, धोडराज-नेलगुंडा आणि पेनगुंडा-कवंडे या प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. महसूल व आपत्ती व्यवस्थापन प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून सज्ज असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट

आज अनंत चतुर्दशी असल्याने जिल्ह्यात सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू होती. अनेक गणेश मंडळांनी मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती; मात्र सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भाविक व तरुणांच्या उत्साहावर विरजन पडले.

कोरची व धानोरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरची तालुक्यात सर्वाधिक ६७.४ मिमी, तर धानोरा तालुक्यात ६७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांतही मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे.

एसडीआरएफच्या जवानांनी वाचवले दोन रुग्णांचे प्राण

पुरामुळे दळणवळण ठप्प झालेले असतानाच, भामरागड तालुक्यातील दोन गंभीर आजारी रुग्णांसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक देवदूत ठरले. होडरी येथील सैतू हबका (वय ६५) आणि कुक्कामेटा येथील मालू वड्डे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने (SDRF) तातडीने बचावमोहीम हाती घेतली.

जवानांनी पुराच्या पाण्यातून बोटीच्या साहाय्याने या दोन्ही रुग्णांना सुखरूपरीत्या बाहेर काढून हेमलकसा येथे आणले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने दोघांवर वेळेवर उपचार सुरू होऊन त्यांचे प्राण वाचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news