Gahanegata Forest Gambling Raid
गडचिरोली : जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या पथकाने आंतरराज्य सीमेलगत गहाणेगाटा जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३७ आरोपींविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ सप्टेंबरच्या रात्री गहाणेगाटा जंगल परिसरात काही जण ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पसार झाले; मात्र पोलिसांनी २९ जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत ७५ हजार १० रुपये रोख, २२ चारचाकी वाहने, ६ दुचाकी, २६ मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत काही व्यक्तींच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तसेच पसार झालेल्या आरोपींसह ३७ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पसार झालेल्या सहा आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या पथकाने केली.