Ravindra Ollalwar joins NCP
गडचिरोली : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, म्हाडाचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांनी माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
रवींद्र ओल्लालवार यांनी अहेरी येथे एका कार्यक्रमात आ. धर्मरावबाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ ते २०१२ या कालावधीत ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये त्यांनी जिल्हा महासचिव, जिल्हा उपाध्यक्ष आणि म्हाडाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. परंतु, मागील वर्षभरापासून पक्षाने त्यांना एकाकी पाडले होते. त्यामुळे ओल्लालवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ओल्लालवार यांच्या भाजप सोडण्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुका आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध नेत्यांना गळाला लावून धर्मरावबाबा आत्राम यांनी राजकीय पक्षांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. मागील आठवड्यात देसाईगंज येथील काँग्रेसचे दबंग नेते जेसा मोटवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गडचिरोली नगर परिषदेत ताकदवर नेते म्हणून ओळखले जाणारे प्रा.राजेश कात्रटवार हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर आता रवींद्र्र ओल्लालवार यांचा प्रवेश झाला.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे राजकारण धर्मरावबाबा आत्राम, राजे अम्ब्रिशराव आत्राम आणि दीपक आत्राम या तिघांच्याच भोवताल फिरत असते. तिघेही एकमेकांना कट्टर राजकीय शत्रू मानत होते. परंतु काल धर्मरावबाबा आत्राम यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. दीपक आत्राम हेदेखील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम प्रथमच मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रे पिंजून काढली आहेत. पूर्वी भाजपचे वजनदार नेते नाना नाकाडे व शिवसेनेचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांना राष्ट्रवादीत घेतल्यानंतर आता काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांना पक्षात घेऊन आरमोरीत विधानसभा क्षेत्रावर हल्लाबोल केला आहे. प्रा.राजेश कात्रटवार यांना सोबत घेऊन गडचिरोलीत, तर अहेरीत रवींद्र ओल्लालवारांना पक्षात आणून विरोधकांना धक्का दिला आहे. तिन्ही ठिकाणी त्यांनी शिंदेसेनेला सोबत घेतल्याने काँग्रेसपेक्षा भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. या सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर झालेल्या जमीन खरेदी घोटाळ्यानंतर घडू लागल्याने अजित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याचे तंत्र वापरत तर नसावेत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.