गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देत १०४ कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला आहे. या बोनसच्या माध्यमातून ४८ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार आहे.
बोनस वितरणासाठी शासनाकडून १२० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्यापैकी १०४ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. शिल्लक रक्कम सोमवारी बँक खात्यांमध्ये जमा होणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला गती मिळणार आहे.
शासनाने हेक्टरी २० हजार रुपये या दराने, अधिकतम दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक आधार मिळत असून, त्यांचे उत्पन्न व उत्पादकता वाढीस हातभार लागणार आहे. बोनस वाटपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित रक्कमही लवकरच उपलब्ध होऊन सर्व लाभार्थींना बोनस दिला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.