Modaske forest operation two women Naxals killed
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत मोडस्के जंगलात आज (दि.१७) दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरुन पोलिसांनी स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा ताब्यात घेतला आहे.
मोडस्के जंगलात गट्टा दलमचे काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या सी-६० दलाची पाच पथके त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आले होते. शिवाय गट्टा पोलिस ठाण्यातील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या १९१ बटालियनच्या पोलिसांनी बाहेरुन नक्षल्यांना घेराबंदी केली. अभियान सुरु असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले.
चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता २ नक्षल महिलांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी मृतदेहांसह एक स्वयंचलित एके ४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तुल, जिवंत दारुगोळा व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
मागील २१ दिवसांत गडचिरोली पोलिसांनी दोन चकमकींमध्ये ६ नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. २७ ऑगस्टला भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलिसांनी ४ नक्षल्यांना ठार केले. त्यानंतर आज मोडस्के जंगलात दोन नक्षली महिलांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले.