Ayushman Bharat Golden Card
गडचिरोली : आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या नोंदणीत गडचिरोली जिल्हृयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज (दि.१५) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
नागपुरातील एम्सच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीदरम्यान हा सत्कार करण्यात आला.
यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा समन्वयक डॉ.सुमेध चाटसे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिष धकाते, देलनवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सुपारे, भामरागड तालुक्यातील कोठी येथील आरोग्य सेवक स्वप्नील येरमे, हालेवारा येथील आरोग्य सेविका करुणा सडमेक, कुव्वाकोडी येथील आशा स्वयंसेविका ललीता तिम्मा यांना आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, ई.रवींद्रन, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, राज्य क्षयरोग अधिकारी श्री.सांगळे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिशा दिली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तालुका व ग्रामपातळीवर नियोजन करुन सर्व विभागांना यात सहभागी करुन घेतले. यामुळे गोल्डन कार्ड सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट सफल झाले. आमची चमू यापुढेही नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असेल, असे सुहास गाडे म्हणाले.