Gadchiroli ZP Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | गडचिरोली: जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्यांना स्थगिती

महायुतीतील घटक पक्षांच्या नाराजीनंतर नियोजन विभागाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli District Planning Committee

गडचिरोली : चालू महिन्याच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरुन प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानंतर शासनाने त्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे.

३ नोव्हेंबरला राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात विधिमंडळ सदस्यांमधून अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार तथा भाजप नेते डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, डॉ.संगीता राऊत, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, संपर्क प्रमुख वर्षा मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) संदीप ठाकूर यांचा समावेश होता.

या समितीवर ९ पैकी भाजपला ५ आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २ जागा देणे अपेक्षित होते. शिवाय तिन्ही विधानसभा क्षेत्रांचा आणि विशेषत: जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश असणे अभिप्रेत होते. परंतु भाजपच्या केवळ आरमोरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना त्यात स्थान देण्यात आले. गडचिरोली आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीत डावलण्यात आले, असे भाजप नेत्यांचे म्हणणे होते. अशीच काहीशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही होती.

यासंदर्भात तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर नियोजन विभागाने आज परिपत्रक जारी करुन ३ नोव्हेंबरला केलेल्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे. नियोजन विभागाचे उपसचिव नि.भा.खेडकर यांनी हे पत्र जारी केले आहे. त्यामुळे नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर सरत्या वर्षात विरजण पडले आहे. तर नाराज शिलेदारांच्या आकांक्षा उंचावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT