Dhanora Model School Protest Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Protest | शिक्षक द्या, नाही तर मॉडेल स्कूल बंद करा! पालक-विद्यार्थी धडकले धानोरा पंचायत समितीवर

मॉडेल स्कूलमध्ये गणित आणि विज्ञान विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Dhanora Model School Protest

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मॉडेल स्कूलमध्ये मागील दीड ते दोन महिन्यांपासून गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी आज धानोरा पंचायत समितीवर धडक देत “शिक्षक द्या, नाही तर मॉडेल स्कूल बंद करा,” अशी आक्रमक मागणी केली.

मॉडेल स्कूलमध्ये गणित आणि विज्ञान विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली. शाळेत आवश्यक विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसतील, तर विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे, असा सवालही पालकांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

पालक आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समितीमध्ये धडक दिल्यानंतर गटविकास अधिकारी वानखेडे आणि गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी या प्रकरणात लक्ष घालत तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्तीऐवजी गणित आणि विज्ञान विषयांसाठी कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी शिक्षकांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT