आशिष म्हशाखेत्री Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Youth Death | नोकरीचे स्वप्न अधुरे: एसआरपी भरतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Desaiganj SRP Recruitment

गडचिरोली : राज्य राखीव दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.६) सकाळी १० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे घडली. आशिष भास्कर म्हशाखेत्री (२३) असे मृत युवकाचे नाव असून, तो आरमोरी तालुक्यातील देलोडा येथील रहिवासी होता.

विसोरा येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्पमध्ये भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरतीत आशिष म्हशाखेत्री सहभागी झाला होता. वेगवान धावपटू असलेल्या आशिषची आज सकाळी पाच किलोमीटर धावण्याची चाचणी होती. परंतु धावताना अचानक तो खाली कोसळला. लागलीच तेथे उपस्थित डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन त्याला तत्काळ देसाईगंज येथे हलविले. परंतु तेथे पोहचण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला. माहिती कळताच कोरची तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या स्वीय सहायकाला पाठवून विस्तृत माहिती जाणून घेत पुढील कार्यवाही करण्याची सूचना संबंधितांना दिली. शिवाय मृतदेह गावी नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करुन दिली.

आशिषने नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतही चांगले गुण मिळवले होते. त्यानंतर तो एसआरपीच्या भरतीत सहभागी झाला होता. परंतु काळाने त्याच्यावर झडप घातली. आशिष हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोसळल्यानंतरही तो धावला

अनेक युवक धावण्याच्या चाचणीसाठी पहाटेपासूनच रांगेत होते. त्यात आशिषदेखील होता. १० वाजताच्या सुमारास त्याचा क्रमांक लागला. धावत असताना सीमारेषा ओलांडण्यासाठी अवघे पाच-सहा फूट अंतर शिल्लक होते. परंतु अचानक तो खाली कोसळला. अशाही परिस्थितीत उठण्याचा प्रयत्न करत लंगडत, हात टेकत त्याने रेषा पदाक्रांत केली. मात्र, या जिगरबाज युवकास जीव गमवावा लागला.

भर उन्हाळ्यात मैदानी चाचणी नको

सध्या कडक उन्हाळा सुरु असून तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. शिवाय शेकडो युवक भरतीत सहभागी होत असल्याने संबंधित यंत्रणेला सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यामुळे युवकांना पहाटेपासूनच रांगेत लागावे लागते. तीन-चार तास उन्हात राहिल्याने अनेक युवकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मैदानी चाचणी उन्हाळ्यात न घेता ती हिवाळ्यात घ्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT