Gadchiroli Crime | आरमोरीत हनिट्रॅप: लाखोंची खंडणी उकळल्यानंतर तरुणाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न

युवतीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तरुणाला केले जात होते ब्लॅकमेल, संबधित युवतीसह दोन युवकांवर गुन्हा दाखल, दुसरीकडे युवतीच्या तक्रारीवरुन संबधित तरुणावरही गुन्हा दाखल
Honey Trap
Honey TrapPudhari
Published on
Updated on

गडचिरोली,: युवतीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन एका युवकाकडून लाखोंची रुपये उकळल्यानंतर त्याला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे हनि ट्रॅप प्रकरण आरमोरीत उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीसह अन्य दोन युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा.आरमोरी) अशी आरोपींची नावे आहेत. दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या तक्रारीवरुन कृष्णा लाड(२६) रा.आरमोरी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरमोरी येथील एका २६ वर्षीय युवकाचे २३ वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध होते. काही महिन्यांनी त्या युवतीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाची एन्ट्री झाली. यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचा फायदा घेत युवतीच्या दोन सहकारी युवकांनी मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचे सांगून संबंधित युवकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 'तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझी बदनामी करू,' अशी धमकी देत दोन युवकांसह युवतीने त्या युवकाकडून वारंवार पैसे मागितले. आपली बदनामी होईल, या भीतीने युवकाने त्यांना पैसे दिले. तिघांनी त्याच्याकडून आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये उकळले.

१५ लाख देण्यास नकार दिल्याने पाजले विष

आधी ४ लाख रुपये उकळल्यानंतरही बदनामीची भीती दाखवत तिघेही त्याच्याकडून पुन्हा पैसे मागण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी युवकाला आणखी १५ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला.

बेदम मारहाण करून पाजले कीटकनाशक
१३ मार्च २०२६ रोजी पीडित युवक ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बळजबरीने कीटकनाशक पाजले. यामुळे युवक बेशुद्ध पडला. लागलीच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

मग रचला आत्महत्येचा बनाव

युवक बेशुद्ध पडताच आता आपले बिंग फुटेल, या भीतीने आरोपींनी त्याने आत्महत्या केल्याचे सिद्ध करण्यासाठी पुन्हा बनाव रचला. त्यांनी पीडित युवकाच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना 'बाबा मला माफ करा' असा संदेश पाठविला. एवढेच नाही तर त्याच्या प्रेयसीच्या मोबाईलवर कीटकनाशकाच्या बाटलीचा फोटो पाठवून आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला.

इकडे विष प्राशन केल्याने युवकाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तत्काळ नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३ एप्रिलला तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या खुलाशामुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली..

युवतीच्या तक्रारीवरुन कृष्णा लाडवर गुन्हा दाखल

याच प्रकरणात पीडित युवतीने कृष्णा लाड याने लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्नास नकार दिला. त्यामुळे कृष्णावर कारवाई करावी, अशी फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी कृष्णा लाड याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९,३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पूजा सिर्सीकर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news