Gadchiroli Police Three Arrested Cyber Fraud Pudhari
गडचिरोली

Cyber Crime Gadchiroli | ऑनलाइन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांची उकल; तिघांना अटक

म्युल अकाउंटच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Police Three Arrested Cyber Fraud

गडचिरोली : बँक खात्यांचा गैरवापर करून विद्यार्थिनींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि समाजमाध्यमावर जाहिरात देऊन दिशाभूल करणाऱ्या दोन स्वतंत्र सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

जुही विनायक मेश्राम (वय २३), रा.आशीर्वादनगर, गडचिरोली, सात्विक दीपक सावडिया (२२) रा. रायगड, छत्तीसगड व साहिल जमशेद खान (२५), रा.सोमका,ता.पहाडी,जि.डीग अशी आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात, गडचिरोलीतील एका २५ वर्षीय विद्यार्थिनीची केदारनाथ सहलीदरम्यान ४ जून २०२६ रोजी एका २२ वर्षीय युवतीशी ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री झाली. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने आपल्या सहा मैत्रिणींशी युवतीची ओळख करुन दिली. २० ऑगस्टला त्या युवतीने सर्व मैत्रिणींची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने नवीन सिमकार्ड घेतले. त्यानंतर ट्रेडिंगसाठी बँक खाते उघडण्याच्या नावाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सर्व मैत्रिणींच्या नावे खाती उघडून घेतली.

पुढे तिने सिमकार्ड बँक खात्यांशी लिंक करुन सर्वांचे पासबूक, एटीएम आणि सिमकार्ड स्वत:कडेच ठेवले. ६ ऑक्टोबरला मैत्रिणींच्या घरी बँकेने नोटीस पाठवली, तेव्हा सर्वजणी अचंबित झाल्या. त्यांनी बँकेत जाऊन पडताळणी केली असता सातही खात्यांमध्ये एक कोटी चार लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे बँकेच्या तपासणीत आढळले. आपल्या परवानगीशिवाय खात्याचा वापर करुन विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी पहिल्या मैत्रिणीने पोलिसांत तक्रार केली.

या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान जुही मेश्राम आणि सात्विक सावडिया यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसऱ्या प्रकरणात, फेसबुकवरील ‘Sajja Handloom’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या स्वस्त बेडशीटच्या जाहिरातीला प्रतिसाद देत एका नागरिकाने दोन व्यवहारांत एकूण १,५५० रुपये पाठवले. मात्र, ऑर्डर केलेला माल मिळाला नाही. तपासात दुकानदाराच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचे समोर आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी राजस्थानातील साहिल जमशेद खान यास अटक केली आहे.

सायबर फसवणुकीपासून सावध राहावे, अनोळखी व्यक्तींना बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, सिमकार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत, ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT