गडचिरोली

Gadchiroli crime | खुनाच्या गुन्ह्यात सहभागी नक्षल समर्थक ११ वर्षांनी जेरबंद

मागील अनेक वर्षांपासून बापू जनगम हा पोलिसांना चकमा देत फरार होता

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस ११ वर्षांनंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा, ता.सिरोंचा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

बापू जनगम हा नक्षल्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद पोलिसांच्या अभिलेखावर आहे. तो नक्षलसमर्थक जीआरडी सदस्य होता. २००७ पासून त्याच्यावर असरअली पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला यासह अन्य गुन्हे दाखल आहेत. विशेषत: २०१५ मध्ये झालेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. या गुन्ह्यातील एका सहआरोपीस न्यायालयाने यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. परंतु बापू जनगम हा पोलिसांना चकमा देत फरार होता.

गावात आला अन्ं जाळ्यात फसला

अशातच १७ जूनला बापू जनगम हा आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती असरअली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ नियोजनबद्धरित्या नडीकुडा गावाला घेराव घालून शोध मोहीम राबवली असता बापू जनगम हा शेतशिवारात आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, हर्षवर्धन बी.जे, पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात असरअलीचे सहायक पोलिस निरीक्षक योगीराज जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रसाद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT