Thali Bajao Protest Congress
गडचिरोली : जिल्ह्यात हिवतापाचा प्रकोप वाढत चालला असून, अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. परंतु शासन आणि प्रशासन प्रभावी उपाययोजन करताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी ८ जुलैला दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेसमोर 'गो मलेरिया गो…' अशा घोषणा देत 'थाली बजाव' आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शासन व प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. शिवाय आठवडाभरात दहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु प्रभावी उपाययोजना करण्यात येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविका व अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त्त आहेत.
पावसाळा सुरु होऊनही अनेक गावांमध्ये औषध साठा पोहचला नाही. उपजिल्हा रुग्णालयांमध्येही सुविधांचा अभाव आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लाँट सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु काम पूर्ण न झाल्याने हे प्लाँट धूळखात आहेत.
एकूणच आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली असून, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्ष मंगळवारी ८ जुलैला 'गो मलेरिया गो…' अशा घोषणा देत 'थाली बजाव' आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.