गडचिरोली : महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिरोली येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी आणि तेथील विविध पदांची भरती शासनामार्फत करावी, या मागणीसाठी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत भीक मागो आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना व त्यांच्या सोबतीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीकरिता जमीन उपलब्ध झाली नाही. हे सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतीक आहे, असा आरोप ब्राम्हणवाडे यांनी केला.
शिवाय वैद्यकीय महाविद्यालयात खासगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असून, ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भीक मागो आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार, आरमोरी काँग्रेस तालुकाअध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, नगरसेवक सुमेध तुरे, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, प्रफुल आंबोरकर आदी सहभागी झाले होते.