गडचिरोली : जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख रुपयांच्या मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
विनयप्रकाश धरमू कुजुर, रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले, रामू झिकटुराम धुर्वे (सर्व रा. गजामेंढी ता.धानोरा जि. गडचिरोली, संजय मुन्ना लकडा, राजेंद्र चूंदा लकडा (दोघेही रा. कवडू ता.राजपूर, जि.बलरामपूर छत्तीसगड) व राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा.तळेगाव ता. कुरखेडा जि.गडचिरोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाहन चोरीसंदर्भात सावरगाव पोलिस मदत केंद्रात ९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गजामेंढी येथील विनयप्रकाश कुजूर यास राजनांदगाव कारागृहात ताब्यात घेतले होते. वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असून, अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने आपण बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करीत असल्याचे विनयप्रकाश याने सांगितले. आरोपींवर मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा,कोटगूल, धानोरा, सावरगाव यासह छत्तीसगड राज्यामध्ये एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. यातील ४२ मोटारसायकलींचा शोध पोलिसांनी घेतला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुलत, सावरगावचे उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, राजेंद्र कोळेकर, सिद्धेश्वरी राऊत यांनी ही कारवाई केली.