Bhamragad Tribal Students Selected for JEE NEET
गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २६ विद्यार्थ्यांची नीट व जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यात नीट प्रशिक्षणासाठी ११ मुले व १४ मुली, तर जेईईसाठी निवड झालेल्या एका मुलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अमरावती आणि नागपूर विभागातून निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी हे भामरागड प्रकल्पातील आहेत. मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर ही निवड करण्यात आली.
पुढील दोन वर्षे नियमित, दर्जेदार व स्पर्धात्मक वातावरणात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांना हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील शासकीय आश्रमशाळेत, तर मुलींना वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील शासकीय आश्रमशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आदिवासी विकास विभाग आणि फिझिक्सवाला यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना NEET व JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या परीक्षेत अतिदुर्गम भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यासाठी भामरागडचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी अभिनंदन केले आहे.
भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आदिवासी विकास विभागाने शिक्षण क्षेत्रात नवी दिशा निर्माण केली आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होत आहे.- अमर राऊत, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी