नागरिकांनी ढोल-ताशांच्या निनादात बसचे स्वागत केले. Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | अतिदुर्गम तुमरकोठीत पहिल्यांदाच पोहचली एसटी बस; पोलिस दलाचा पुढाकार

भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या गावांतील नागरिकांनी गावात परिवहन महामंडळाची बस पाहिली

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Bhamragad Bus Service

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर आज प्रथमच भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या गावांतील नागरिकांनी गावात परिवहन महामंडळाची बस पाहिली. आता आपली पायपीट थांबेल,या आशेने आनंदित झालेल्या नागरिकांनी ढोल-ताशांच्या निनादात बसचे स्वागत केले.

तुमरकोठी, तोयनार, मुरमभुशी ही आदिवासीबहुल गावे नक्षलग्रस्त असल्याने अनेक वर्षे त्या भागात पक्के रस्ते नव्हते. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांचा कायम अभाव होता. परिणामी नागरिकांना खाचखळग्यांमधून मार्गक्रमण करावे लागायचे. परंतु पोलिस अधीक्षक नीलोत्प्ल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा पुरवून पक्के रस्ते बांधले आणि आज गावात बस पोहोचली.

अहेरी आगारातून सुटलेली बस तुमरकोठीत पोहताच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य वाजवत आणि हातात तिरंगा घेऊन 'भारत माता की जय' अशा घोषणा देत बसचे स्वागत केले. तुमरकोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ सुरासे यांच्या हस्ते बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

विविध गावांतील पाचशे नागरिकांना मिळणार लाभ

अहेरी-तुमरकोठी या शंभर किलोमीटर पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बस सुरु झाल्याने परिसरातील विविध गावांतील पाचशे नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. भामरागड या तालुकास्थळी पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना सोयीचे झाले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भामरागड किंवा अहेरी येथे ये-जा करण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

पोलिस दलाने विणले विकासाचे जाळे

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलिस दल केवळ नक्षलवाद्यांचा बीमोड करीत नसून दुर्गम भागाचा विकास करण्यासाठीही दूत म्हणून काम करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी संरक्षण पुरविल्याने जिल्ह्यात ५५९ मोबाईल टॉवर तयार झाले. शिवाय ४२४ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि ६५ पुलांचे कामही पूर्ण झाले आहे. वर्षभरात गट्टा-गर्देवाडा, कटेझरी आणि मरकनार अशा दुर्गम भागात पहिल्यांदाच परिवहन महामंडळाची बससुविधा उपलब्ध करुन देण्यात पोलिस दलाला यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT