गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे.  Pudhari News Network
गडचिरोली

भामरागड अजूनही पाण्यातच: १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्याने १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. काल सकाळपासून भामरागड गावात शिरलेले पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी अजूनही कायम आहे. भामरागड येथील ३२६, तर सिरोंचा तालुक्यातील कर्जेली येथील २८ जणांना निवारागृहात हलविण्यात आले आहे.

भामरागडमधील नागरिकांना अन्नाची पाकिटे 

आज सकाळी सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथील नाल्याच्या पुरात एक कार अडकली होती. त्यातील ४ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. शिवाय भामरागड येथील दोन रुग्णांना सुरक्षितरित्या पुरातून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. भामरागडमधील पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येत आहेत.

१३ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

पुरामुळे आलापल्ली-भामरागड, सिरोंचा-जगदलपूर, कोरची-बोटेकसा, अहेरी-देवलमरी-मोयाबीनपेठा, भामरागड-धोडराज-कवंडे, भामरागड-आरेवाडा, एटापल्ली-गट्टा, देसाईगंज-ब्रम्हपुरी इत्यादी १३ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे.

गोसेखुर्द धरणातून १ लाख ९० हजार क्युसेक विसर्ग

मागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात सर्वाधिक १५३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मुलचेरा तालुक्यात १२५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, गोसेखुर्द धरणातून १ लाख ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT