अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मुलचेरा येथे बांधण्यात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाचा सज्जा कोसळल्याने युवा मजुराचा मृत्यू झाला. गितेश ललीत मिस्त्री (वय.१९रा.गुंडापल्ली) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.5) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने २५ कोटी रुपये खर्चून शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. गुरुवारी गितेश मिस्त्री हा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर काम करीत होता. परंतु अचानक सज्जा कोसळल्याने तो खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलचेरा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
आश्रमशाळा आणि इमारतीचे बांधकाम भंडारा येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे. इमारत निर्माणाधीन अवस्थेत असतानाच सज्जा कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहात शेकडो विद्यार्थी वास्तव्य करणार आहेत. अशावेळी निकृष्ट बांधकाम होऊन पुन्हा काही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.