Arrest Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Ashram School girls death : आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकास अटक

अनुदानित आश्रमशाळा ही कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे संचालित केली जाते

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकास अटक केली आहे.

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळा ही कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे संचालित केली जाते. सोमवारी (ता.१०) मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे दीपिका लकडा (वय: १२ वर्षे), सुष्मिता मंडल (वय: १४ वर्षे) आणि अनू कोरेटी (वय: ८ वर्षे) या तीन मुलींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी (वय: ११ वर्षे), कविता किरंगे (वय: १२ वर्षे) आणि समृद्धी नैताम(वय: १४ वर्षे) या तीन विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी दीपिका मडावी हिच्यावर नागुपरात उपचार सुरु आहेत.

घटनेसंबंधी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीनंतर सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन धानोरा पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार तथा काँग्रेस नेते मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार व अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (अ),१२५ (ब), ३(५) तसेच बाल न्याय(दुरुस्ती)अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर रात्री उशिरा मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार व अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक करण्यात आली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT