Mobile theft suspicion student assault Aheri
गडचिरोली : मोबाईल चोरीच्या संशयावरुन शाळेच्या शिपायाने १२ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत घडला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अजय रमेश चंद्रगिरवार(२७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय चंद्रगिरवार हा वांगेपल्ली येथील शासकीय अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. ३१ जानेवारीला दुपारी अजयने शाळेतील सातवीत शिकणारा विद्यार्थी पियुष तलांडे व अन्य ११ विद्यार्थ्यांना मोबाईल चोरी का केली, असा जाब विचारला. मी मोबाईल चोरला नाही, असे प्रत्येकाने सांगितले. मात्र, संतापलेल्या शिपायाने सर्वांना छडीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्यांना दुखापत झाली.
माहिती मिळताच पियुषचे वडील जीवन तलांडे यांनी तातडीने शाळेत जाऊन आपला पाल्य आणि अन्य विद्यार्थ्यांची पाहणी करुन विचारपूस केली. पियुष व अन्य विद्यार्थ्यांनी आपबिती सांगितली. काही वेळाने अन्य पालकही शाळेत पोहचले. तेव्हा शाळेत जबाबदार कर्मचारी आढळून आले नाही. त्यानंतर जीवन तलांडे यांनी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरवार याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) व बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला.