गडचिरोली : आरमोरी मार्गावरील चुरमुरा ते किटाळी गावादरम्यानच्या वळणावर खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र, थोडक्यात बचावल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एमएच ४० वाय ५४९८ क्रमांकाची गडचिरोली आगाराची बस आरमोरीकडे जात होती. चुरमुरा ते किटाळीदरम्यानच्या वळणावर समोरून एक अवजड वाहतूक करणारा ट्रक वेगाने येत होता. त्यामुळे प्रसंगावधान राखत बसचालक शत्रुघ्न मगरे यांनी बस रस्त्याच्या खाली उतरवून थांबवली.
मात्र, याच सुमारास गडचिरोलीकडून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स अतिवेगाने आली. समोरुन येणारा ट्रक आणि बाजूला उभी असलेली बस पाहून ट्रॅव्हल्सचालक भांबावला. त्याने लगेच ब्रेक दाबला. मात्र, ट्रॅव्हल्स वेगाने असल्याने ती बसला जाऊन आदळली. यामुळे ट्रॅव्हल्सच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले, तसेच बसचाही पत्रा निखळला. अपघाताच्या वेळी बसमध्ये २२, तर ट्रॅव्हल्समध्ये ३० प्रवासी होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवासी प्रचंड धास्तावले. मात्र, कुणालाही दुखापत झाली नाही. यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला.