नारायण कंवलसिंह बोगा याच्या ३० एप्रिल रोजी झालेल्‍या लग्‍नातील फोटो. Pudhari Photo
गडचिरोली

Gadchiroli News | हळद निघण्यापूर्वीच निघाली युवकाची अंत्ययात्रा: कोरची तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

पोटात दुखल्‍याचे निमित्त : नववधूच्या मांडीवर डोके ठेवून सोडला प्राण

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : वडिलांचे पितृछत्र आधीच हरपलेले. एकट्या आईला खूप कामं करावे लागतात म्हणून मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि स्वागत समारंभही आटोपला. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अचानक प्रकृती बिघडली आणि हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकवत नवरदेवाचा मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथे आज घडली. नारायण कंवलसिंह बोगा(२६) असे मृत नवविवाहित युवकाचे नाव आहे.

नारायण बोगा हा अत्यंत साधा. १५ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून आई आणि नारायण दोघेच राहायचे. कित्येक वेळा आईने काबाडकष्ट करुन आपणास मोठे केले. त्यामुळे तिच्या मदतीला चांगली सून आणेन, असं त्याला सतत वाटायचं. त्याअनुषंगाने यंदा नारायणनं लग्न करण्याचं ठरवलं. आईनेच सून बघितली.

३० एप्रिलला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरुराम कुमेटी यांच्या दीपिका नामक मुलीशी त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभही पार पडला. लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितलं होतं.

त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला. त्याला बरे वाटू लागले. मात्र, आज पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तो मित्र आणि नववधूला घेऊन स्वत:च मोटारसायकल चालवत वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला. परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकले आणि तेथेच त्याने प्राण सोडला. या घटनेमुळे गहाणेगाटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT