

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आत्मसमर्पित नक्षल्यांना हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी ४ रो-हाऊसेस तयार करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन आज पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते झाले.
राज्य शासनाने २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबविलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत वरिष्ठ कॅडरसह ७०४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. २०२२ पासू आतापर्यंत ५५ आणि जानेवारी २०२५ पासून २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यातील बहुतांश आत्मसमर्पितांचे पोलिसांनी पुनर्वसन केले आहे. त्यांच्यासाठी आज 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आज नव्या आत्मसमर्पितांसाठी ४ रो-हाऊसेस बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते झाले. हे रो-हाऊसेस सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.
'प्रोजेक्ट संजीवनी' उपक्रमांतर्गत आत्मसमर्पितांना केंद्र व राज्य शासनाच्या बक्षिसाचे सुलभ वितरण, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत भूखंड उपलब्ध करुन देणे, त्यांना सरकारी योजनांसाठी आवश्यक दस्तऐवज मिळवून देणे, स्वयंरोजगारासाठी मोटार ड्रायव्हींग, शिवणकाम, ब्यूटी पार्लर, पशूपालन, टेक्नीशियन इत्यादी प्रशिक्षण देणे, वैद्यकीय मदत करणे, सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे इत्यादी योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, प्रभारी पोलिस उपअधीक्षक(गृह) विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, निखिल फटींग, रेवचंद सिंगनजुडे, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी, अंमलदार व ५० हून अधिक आत्मसमर्पित नक्षलवादी उपस्थित होते.