Airport land acquisition protest
गडचिरोली : गडचिरोली नजीक होणाऱ्या प्रस्तावित विमानतळासाठी प्रशासन सुपीक जमिनीचे अधिग्रहण करण्याबाबत प्रशासन आग्रही भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांनी मुरखळा येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.
प्रस्तावित विमानतळ गडचिरोली तालुक्यातील मुरखळा, कनेरी, नवेगांव, मुडझा(बु), मुडझा(तु) आणि पुलखल या गावांच्या हद्दीत निर्माण केले जाणार आहे. यासाठी नागपूर येथील एका खासगी विमान विकास कंपनीला भूसंपादनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने सहाही गावांतील सुपीक शेतजमिनींचे भूसंपादन करण्याबाबत हालचाली वाढल्या आहेत. यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
या विमानतळामुळे शेतकऱ्यांच्या बारमाही सुपीक जमिनी अल्पदर देऊन संपादित करण्यात येणार असून, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.
या बाबीचा विरोध करण्यासाठी सहाही गावांतील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते शरद पाटील ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात २८ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
यासंदर्भात शरद पाटील ब्राम्हणवाडे यांनी सांगितले की, प्रस्तावित विमानतळामुळे सहाही गावांतील सुमारे २०१ हेक्टर म्हणजेच जवळपास ५०० एकर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. ही जमीन सुपीक असून जवळपास ५० ते ६० शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
शिवाय या परिसरात असलेले काही जणांचे शेतीपूरक उद्योगही बंद होणार आहेत. गावातील तलाव, बोळी, नाले, गुरांचे चराई क्षेत्र, झुडपी जंगल आणि पारंपरिक श्रद्धास्थाने यांसारख्या सामूहिक मालमत्तांचेही नुकसान होणार आहे.
विमानतळामुळे पुलखल आणि मुडझा या गावांना रस्तेच शिल्लक राहणार नाही. मुरखळा-पुलखल-मुडझा परिसरातील वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा दाब नियंत्रित करणारा नाला बुजविला जाण्याची शक्यता आहे.
यामुळे शेती आणि रस्त्यांना पुराचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुलखल ग्रामसभेने यापूर्वीच एक ठराव पारित करून या भूसंपादनाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने नोटीस जारी करुन आक्षेप मागविले होते. त्यानुसार आम्ही आक्षेप नोंदविले. परंतु प्रशासन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही, असा आरोप शरद पाटील ब्राम्हणवाडे यांनी केला.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या पुढील भागातील झुडपी जंगलाच्या जमिनीवर विमानतळ प्रस्तावित केले होते. ती जमीन योग्य असून, तेथेच विमानतळ तयार करावे, अशी मागणीही ब्राम्हणवाडे यांनी केली.