Gadchiroli farmer issues
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील शेतकरी गजानन नामदेव लाकडे (५५) यांनी आज (दि. १३) सकाळी शेतातील झाडाला गळफास लावून जीवन संपविले. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून, काही शेती लोहमार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आली होती. शिवाय अवकाळी पावसामुळे धानपिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा कयास आहे.
दरम्यान, आज दुपारी १२ वाजता ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतरही शवविच्छेदन करण्यासाठी संध्याकाळचे ६ वाजल्याने नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. मृतक गजाजन लाकडे यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी केली आहे.