गडचिरोलीत रानटी हत्तीचा कळप Pudhari Photo
गडचिरोली

Elephant Attack Gadchiroli | गडचिरोलीत रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी

Elephant Attack Gadchiroli | धानपिकाचेही केले नुकसान, कळपामध्ये १८ हत्तींचा समावेश, परिसरात दहशतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून गडचिरोली वनपरिक्षेत्रात मुक्त संचार करीत असलेल्या रानटी हत्तींनी वाकडी व परिसरातील तीन-चार गावांमध्ये धुमाकूळ घालत आज तीन महिलांवर हल्ला करुन गंभीर केले. यातील एका महिलेला नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कृपाळा या गावी घडली. सुशीला टेमसू मेश्राम, योगीता उमाजी मेश्राम व पुष्पा निराजी वरखडे अशी जखमी महिलांची नावे असून, यातील सुशीला मेश्राम हिला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे, तर अन्य दोघींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत.

मागील तीन-चार दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील वाकडी, म्हसली, कृपाळा व हिरापूर या गावांमध्ये रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी कृपाळा येथील १०-१२ महिला गावानजीकच्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. एवढ्यात जवळपास १८ हत्तींचा कळप तेथे पोहचला. यातील काही हत्तींनी तीन महिलांवर हल्ला चढविला. सुशीला मेश्राम या महिलेला एका हत्तीला आदळल्याने तिला मुका मार लागला. बेहोश अवस्थेत तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. अन्य दोघी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शिवाय हत्तींनी वाकडी येथील माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या तीन एकर शेतातील उन्हाळी धानपिकाची नासधूस केली. शिवाय म्हसली येथील यशवंत झरकर यांच्या शेतातील शेड उद्ध्वस्त केले. तसेच हिरापूर येथील तीन ते चार शेतकऱ्यांच्या पिकाचीही नासधूस केली. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे तालुका महामंत्री बंडू झाडे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT