Sharad Baviskar Speech Gadchiroli
गडचिरोली : जेव्हा एकच संस्कृती वर्चस्ववादाचा दावा करते, तेथे राजकारण असते. जेथे आपल्या उन्नतीचा विचार केला जात नाही ती आपली संस्कृती कशी, असा परखड सवाल नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक तथा विचारवंत डॉ.शरद बाविस्कर यांनी केला.
दंडकारण्य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक गोविंदराव मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त कमल-गोविंद प्रतिष्ठानच्या वतीने सुमानंद सभागृहात आयोजित 'आपण आणि आपलं सांस्कृतिक राजकारण' या विषयावर व्याख्यान देताना डॉ.बाविस्कर बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.प्रमोद मुनघाटे, अध्यक्ष डॉ.राजाभाऊ मुनघाटे, उपाध्यक्ष अनिल मुनघाटे उपस्थित होते.
प्रा.डॉ. बाविस्कर पुढे म्हणाले, कल्चर आणि सिव्हीलायजेशन हे दोन भिन्न शब्द आहेत. सिव्हीलायजेशनला वर्चस्ववादाचा गंध आहे, तर संस्कृती ही गतीशिल आहे. संस्कृतीचा विकास होत नसेल तर आपण परावलंबी होऊ. त्यामुळे संस्कृती ही भौतिक जीवनाचं पुनर्निमाण आहे. आपलं सांस्कृतिक जीवन आपलं आहे काय, जेथे आपल्या उन्नतीचा विचार केला जात नसेल किंवा संस्कृतीचे कायदे बदलण्याचा आपणास अधिकार नसेल तर ती संस्कृती आपली कशी, असे सवाल करत डॉ.बाविस्कर यांनी सांस्कृतिक व्यवहाराची चर्चा करुन संस्कृतीची लोकशाही मूल्यांच्या आधारे चिकित्सा व्हायला हवी, असं मत मांडलं.
जेव्हा एकच संस्कृती वर्चस्ववादाचा दावा करते; तेथे राजकारण असते, असे स्पष्ट करत डॉ.बाविस्कर यांनी ज्यांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही, ते शैक्षणिक धोरण ठरवत असून भारतीय संस्कृतीचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास होऊ द्यायचा नाही, याची काळजी नवीन शैक्षणिक धोरणात घेतली गेल्याची टीका केली.
संस्कृती ही मठ किंवा धार्मिक ग्रंथात सापडत नसते. ती सामूहिक जीवनाशी संबंधित आहे. परंतु भारतात मात्र सामाजिक लोकशाही येणारच नाही, याची तजवीज आधीपासूनच करुन ठेवण्यात आली आहे. सांस्कृतिक जीवन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. जेवढे तुम्ही बुद्धीविरोधी; तेवढं तुम्हाला मोठं पद, ही या देशातील स्थिती असून, ती एकप्रकारची प्रतिक्रांतीच आहे. जागतिक मूल्ये खालावली असून, सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या जमान्यात आपण दिवसरात्र विकले जात आहोत, याविषयी प्रा.डॉ.बाविस्कर यांची चिंता व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.बाविस्कर यांनी उपस्थित बुद्धीजिवी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, तर प्रास्ताविक डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी केले.