गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा कार्यभार स्वीकारुन चार दिवस होत नाही, तोवर डॉ.अनिल रुडे यांची यांची बदली करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ.माधुरी विके-किलनाके यांची जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती केली आहे. दीड वर्षांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक पदावर असताना डॉ.रुडे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरल्यानंतरही त्यांना पुन्हा त्याच पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयातून शुक्रवारी (दि.16) नवा आदेश जारी झाला आहे.
यापूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार १२ ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे मुदतवाढीसाठी दाद मागितली होती. परंतु २९ जुलैला त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने १२ ऑगस्टला त्यांचा कालावधी संपला. त्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ.कांचन वानेरे यांनी डॉ.खंडाते यांना सेवामुक्त करण्याचे आदेश देऊन रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात सोपविला होता. आदेश धडकताच डॉ.रुडे फार वेळ न दवडता पदभार स्वीकारला.
मात्र, डॉ.अनिल रुडे हे यापूर्वी पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक असताना त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने त्यांची विभागीय चौकशी प्रलंबित आहे. शिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही रुडे यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. असे असताना आरोग्य उपसंचालकांनी डॉ.रुडे यांच्याकडेच पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार सोपविल्याने सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली. माध्यमांनीही हा विषय लावून धरला होता. अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव व.पां.गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी(शस्त्रक्रिया) डॉ.माधुरी किलनाके यांच्या नियुक्तीचे आदेश आज जारी केले. त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ.कांचन वानेरे यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे.