राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज चामोर्शी येथे जनकल्याण यात्रा काढण्यात आली. (Pudhari Photo)
गडचिरोली

Dharmaraobaba Atram | भाजपने मला पाडण्यासाठी पाच कोटी देऊन पुतण्याला उभे केले: धर्मरावबाबा आत्राम यांचा भरसभेत गौप्यस्फोट

Gadchiroli Politics | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज चामोर्शी येथे जनकल्याण यात्रा

पुढारी वृत्तसेवा

Dharmaraobaba Atram vs BJP

गडचिरोली : मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये देऊन माझ्या विरोधात पुतण्याला उभे केले, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आज चामोर्शी येथील सभेत करुन महायुतीला घरचा आहेर दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज चामोर्शी येथे जनकल्याण यात्रा काढण्यात आली. यावेळी आयोजित सभेत धर्मरावबाबांनी भाजपवर जोरदार टीका करीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

या यात्रेत सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ.तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, रिंकू पापडकर, ॲड. डिंपल उंदिरवाडे, डॉ.नोमेश जुवारे आदी मान्यवर उपस्थित होते

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, भाजपने पाच कोटी रुपये देऊन माझ्या पुतण्यालाच माझ्याविरोधात उभे करुन मला पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु मी निवडून आलो. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मी एक तुकडासुद्धा देणार नाही. माझ्या मतदारसंघात आम्ही किती जागा लढाव्यात आणि कुणाला किती द्याव्यात, हे मीच ठरवणार.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही, असा इशाराही आत्राम यांनी दिला. अहेरी क्षेत्रात अन्य पक्ष आहेतच कुठे, असा सवाल करीत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा. भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचही जमीन जाऊ देणार नाही; कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला. सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: मिटकरी

पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मात्र महायुती सरकारने भरीव मदत केली असून पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. गडचिरोली हा क्रांतीचा आणि संघर्षाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार खंबीरपणे सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महायुतीत बेबनाव

दोन दिवसांपूर्वीच धर्मरावबाबांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे माझ्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज त्यांनी भाजपवर निशाणा साधल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT