Dhanora Ashram School Student Death Case
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार व अधीक्षक भास्कर भोयर अशी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सोमवारी मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे दीपिका लकडा(१२), सुष्मिता मंडल(१४) आणि अनू कोरेटी(८) या तीन मुलींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी(११), कविता किरंगे(१२) आणि समृद्धी नैताम(१४) या तीन विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी दीपिका मडावी हिच्यावर नागुपरात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. शिवाय तत्काळ चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या चौकशीत मुख्याध्यापक, मुलींच्या अधीक्षिका व मुलांचे अधीक्षक दोषी आढळल्याने सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार केली.
त्यानुसार, पोलिसांनी प्रशांत ताटपल्लीवार, भाग्यश्री चिलमवार व भास्कर भोयर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब),३(५) तसेच बाल न्याय(दुरुस्ती)अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार यांना संस्थेने घटनेच्या दिवशीच निलंबित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त आयुषी सिंह यांनी 'पुढारी'ला दिली. तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या सोडे आणि मुरुमगाव येथील आश्रमशाळांमध्ये करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देणार असून, संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहेत.