

मुंबई : गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नसल्याबद्दल संताप व्यक्त करतानाच या आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या रात्री सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर तिघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याचे तीव्र पडसाद उमटले.
काँग्रेस नेत्याची आश्रमशाळा
आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी बैठकीत या घटनेची माहिती दिली. काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यासारखे तीनवेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा असे चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार, असा सवाल आदिवासी मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केला. एवढा मोठा राजकीय व सामाजिक अनुभव असलेल्या व्यक्तीच्या अनुदानित आश्रमशाळेत जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारची गंभीर आणि अक्षम्य चूक होत असेल तर त्यांना नक्कीच जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षक नाही, वॉर्डन नाही, शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाहीत.
नाशिक - पालघर भूकंपांच्या धक्क्याची चर्चा
राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अलीकडच्या काही दिवसांत नाशिक - पालघर परिसरात जाणवलेल्या भूकंपांच्या धक्क्याचीही चर्चा झाली. या घटनांची सेंटर फॉर सेस्मिक टेक्नॉलॉजीमार्फत अभ्यास सुरू आहे. त्यासोबतच आणखी चांगल्या संस्था आणा आणि सर्वंकष मूल्यमापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच लोकांमध्ये जनजागृती करा, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा, असेही प्रशासनाला सांगितले.