वैभव पांढरे Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime | अहेरी नगर पंचायतीच्या कर अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला: माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवारसह 4 जणांवर गुन्हे

ड्रायव्हिंग स्कूलची गाडी बघून पळाले आरोपी

पुढारी वृत्तसेवा

Aheri Nagar Panchayat Tax Officer Attacked

गडचिरोली : अहेरी नगर पंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर आज (दि. १०) सकाळी मॉर्निंग वॉक्‍ दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पांढरे हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अजय कंकडालवार (वय ४५ रा.अहेरी) , पिंटू मडावी (वय ३५) व अजय नैताम (वय ३५, दोघेही रा. इंदाराम, ता.अहेरी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींमध्ये एका अनोळखी युवकाचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, अहेरी नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) हे आज सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अहेरी-इंदाराम मार्गावरुन मॉर्निंग वॉक करीत असताना अबनपल्ली ते चेरपल्ली फाट्याजवळ तिघे जण एमएच ३३-८९८९ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो वाहनाने अजय कंकडालवार, पिंटू मडावी व अजय नैताम हे तिघे जण तेथे आले. त्यांनी पांढरे यांना अडवून जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पांढरे यांनी प्रतिकार केला असता अजय कंकडालवार यांनी लाकडी दांड्याने त्यांचे डोके, कपाळ आणि डाव्या हाताच्या भुजेवर जोरदार प्रहार केला. यामुळे पांढरे हे रक्तबंबाळ झाले.

ड्रायव्हिंग स्कूलची गाडी बघून पळाले आरोपी

मारहाण होताच वैभव पांढरे यांनी ओरडून मदत मागितली. तेवढ्यात त्या मार्गावरुन एका ड्रायव्हींग स्कूलची गाडी येताना दिसली. गाडी बघून आरोपींनी पांढरे यांना सोडले. त्यानंतर पांढरे यांनी ड्रायव्हींग स्कूलच्या गाडीने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांपूर्वी अजय कंकडालवार यांची अतिक्रमित जागेवरील इमारत नगर पंचायत प्रशासनाने पाडली होती. तो राग मनात धरुन कंकडालवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार पांढरे यांनी केली.

त्यानंतर पांढरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अजय कंकडालवार, पिंटू मडावी व अजय नैताम यांच्यासह अन्य एका अनोळखी इसमावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२,३५१(२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मंगेश वळवी घटनेचा तपास करीत आहेत.

कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन

दरम्यान वैभव पांढरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि नऊ नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांनी आज तत्काळ कामबंद आंदोलन सुरु केले. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे नगर परिषदा व पंचायतींशी संबंधित बांधकाम, स्वच्छता, कर व अन्य विषयांवरील कामकाज खोळंबल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT