

Chamorshi Minor Girl Assault
गडचिरोली : घराच्या गच्चीवर खेळत असलेल्या ७ वर्षीय बालिकेवर रंगकाम करणाऱ्या युवकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना चामोर्शी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रज्वल उर्फ नारु सदाशिव भांडेकर (वय २५, रा.चामोर्शी) यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या घराच्या रंगरंगोटीचे काम सुरु आहे. त्यामुळे सोमवारी (दि.८) ती घराच्या गच्चीवर खेळत होती. ही संधी साधून रंगकाम करणारा युवक प्रज्वल भांडेकर याने बालिकेस बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
काही वेळानंतर पीडित बालिकेला वेदना होऊ लागल्याने तिला रुग्णालयात नेले असता तपासणीदरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी प्रज्वल भांडेकर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ६५(२) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या सहकलम ४,६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
चामोर्शीचे पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले घटनेचा तपास करीत आहेत.