Road Collapse Investigation
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोरची तालुक्यात बांधण्यात आलेला पूल व रस्ता खचल्याचे प्रकरण गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सह पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोरची तालुक्यातील बेतकाठी-नाडेकल-डोलीटोला या अंदाजे ३० किलोमीटर लांबीचा रस्ता अल्पावधीतच फुटला आहे. शिवाय नाडेकल-कोहका मार्गावरील खोब्रागडी नदीवर दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल निकृष्ट बांधकामामुळे कॉलमसह पडला आहे. दोन्ही प्रकरणांतील कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून, पूल बांधणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित अभियंता व उपविभागीय अभियंत्यास निलंबित करावे इत्यादी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे, नीळकंठ संदोकर व चंद्रशेखर सिडाम हे आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
त्यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन दिले. याविषयी प्रश्न विचारला असता, जयस्वाल यांनी रस्ता व पूल खचल्याचे प्रकरण गंभीर असून, चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
गडचिरोली येथे विमानतळ निर्मितीसाठी सुपीक जमिनी अधिग्रहीत करु नये, अशी शेतकऱ्यांनी केलेली मागणी योग्य आहे. त्यादृष्टीने प्रशासन नव्या जमिनीचा शोध घेणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे वारंवार अपघात घडत आहेत. त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांची नवी व्यवस्था निर्माण करण्यावर शासन विचार करीत असल्याची माहितीही अॅड.जयस्वाल यांनी दिली.
विकसित गडचिरोली निर्माण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्याअनुषंगाने महिला, बेरोजगार युवक, युवती यांना आत्मनिर्भर करण्यावर शासन भर देत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ.डॉ.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते.