गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलातून दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत १२ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राज्य पक्षी शेकरु, उडणारी खार, घुबड यासह अन्य पक्षी आणि त्यांचे अवयवही ताब्यात घेण्यात आले आहेत.
रविवारी(१९) संध्याकाळी काही जण शिकारीसाठी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळताच त्या भागात वनकर्मचाऱ्यांनी सामूहिक गस्त घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांना संशयित नागरिक आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन त्यांना थांबवले. त्यानंतर १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून चार शेकरु, एक उडणारी खार, एक हरियाल तसेच घुबड व अन्य पक्षी आणि त्यांचे अवयव, तसेच शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. या १२ जणांवर रात्री उशिरा भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली.
आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले, उपविभागीय वनाधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी गौरव गणवीर, क्षेत्र सहायक पूनमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, शाम जंगमवार, नामाजी मडावी, देवाजी सलामे आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, जंगलात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास नागरिकांना तत्काळ वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी गोरख गणवीर यांनी केले आहे.