

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून अवैधरित्या सागवान व बिजा वृक्ष तोडल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक केली. त्यांना ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. चिन्नू रैनू दुगा, कालिदास बिड्डू आतला आणि संतोष देवराव तोफा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२६ मार्च रोजी मेंढा येथील वनरक्षक एच.के.मडावी व क्षेत्र सहायक ए.के.गांगरेड्डीवार हे दुधमाळा परिसरात गस्तीवर असताना मेंढा गावालगत संतोष देवराव तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा प्रजातीची झाडे पडलेली आढळून आली. ही झाडे अवैधरित्या जंगलातून तोडून आणल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत वनाधिकाऱ्यांनी १९ सागवान व २ बिजा प्रजातीची लाकडे जप्त केली. भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये तिघांना अटक करून त्यांना ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींनी सागवान लाकडे सामूहिक वनहक्कप्राप्त गावाशेजारील जंगलातून आणल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात इतर गावांतील नागरिकांचाही सहभाग असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस, सहायक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.