Aheri Allapalli Accident
गडचिरोली : अहेरीवरून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला अज्ञात चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधील ८ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. हा भीषण अपघात आज (दि.९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
एमएच ३३ डब्लू ००४८ क्रमांकाचा ऑटो अहेरी येथून आल्लापल्लीच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे ऑटो रस्त्यावरच उलटला. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघातात ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख(४१), रा.अहेरी यांची छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासह तनवीरजा गफूर शेख (२८) रा.अहेरी, हुसनबी सरवर शेख(६०), रा. अहेरी), जमिला हसन शेख (४७), ममता वेलादी (२५), रा.भंगारमपेठा, श्यामला येमुलवार (३९), रा.अहेरी), शांता गडडमवार (६५), रा.कोत्तूर) आणि मंगेश मेश्राम (३७),रा.नवेगाव हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत सर्व जखमींना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख, मंगेश मेश्राम, ममता वेलादी व अन्य एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चैतन्य घावटे घटनेचा तपास करीत आहेत.