

गडचिरोली : धानोरा-मुरुमगाव मार्गावरील जपतलाई गावाजवळ रविवारी (दि. २५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची भीषण धडक झाली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील 'मालिनीताई दहिवले अनुदानित आश्रमशाळेत' २६ जानेवारीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना आणण्यासाठी एक स्कार्पिओ वाहन गोडलवाहीकडे जात होते. दरम्यान, जपतलाई गावाजवळील नागमोडी वळणावर धानोरा बाजूकडून येणाऱ्या दुसऱ्या एका कारने स्कार्पिओला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, स्कार्पिओ वाहन रस्त्यावरच उलटले, तर दुसरी कार रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात स्कार्पिओमध्ये असलेला रोशन राजू किरंगे (१२, रा. गोडलवाही) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे गोडलवाही गावावर शोककळा पसरली आहे.
दुसऱ्या कारमध्ये छत्तीसगड राज्यातील मोहला येथील एक कुटुंब (पती, पत्नी व मुलगा) प्रवास करत होते. यातील निधी गुप्ता (४३) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातातील मृत विद्यार्थ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नागमोडी वळणावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.