Vishwajit Kovase Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Congress | गडचिरोली काँग्रेसचे अॅड. विश्वजित कोवासे नवे जिल्हाध्यक्ष: कार्यकर्त्यांमध्ये 'कहीं खुशी, कहीं गम'

तरुणतुर्क आणि सर्वाधिक सक्रिय जिल्हाध्यक्ष असलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उचलबांगडी

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Congress new president Vishwajit Kovase

गडचिरोली : काँग्रेसने तरुणतुर्क आणि सर्वाधिक सक्रिय जिल्हाध्यक्ष असलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उचलबांगडी करीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये 'कहीं खुशी, कहीं गम' असे चित्र पाहावयास मिळत आहे.

अॅड.विश्वजित कोवासे हे राज्याचे माजी मंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे पहिले खासदार मारोतराव कोवासे यांचे चिरंजीव आहेत. विश्वजित यांनी यापूर्वी युवक काँग्रेसमध्ये प्रदेश महासचिवपद भूषवले आहे. त्यानंतर मागील वर्षी त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मितभाषी, साधा स्वभाव व युवा नेतृत्व अशी विश्वजित कोवासे यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीचे काही कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले; तरी महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उचलबांगडी केल्याने एका गटात नाराजीचा सूर पसरला आहे.

ब्राम्हणवाडे यांचे कार्य उल्लेखनीय

ब्राम्हणवाडे यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना कोरोना महामारीच्या काळात जिवाची तमा न बाळगता अनेक दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान केले. शिवाय त्यावेळी युवक काँग्रेस सक्रिय असल्यामुळे काँग्रेस जिवंत भासत होती. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने ६ ऑक्टोबर २०२१ रोजी ब्राम्हणवाडे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना सक्रिय केले.

राज्य व केंद्र सरकारविरोधात अनेक अभिनव आंदोलने केली. त्याचाच परिणाम म्हणून २०२४ च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात डॉ.नामदेव किरसान विजयी झाले. तसेच विधानसभा निवडणुकीत आरमोरी क्षेत्रातून रामदास मसराम निवडून आले. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतही मागील वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसचे संख्याबळ वाढले. तरीही त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने एका गटात नाराजीचा सूर उमटत आहे.

भाजपला कळते, काँग्रेसला का नाही?

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी ही तिन्ही विधानसभा क्षेत्रे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यामुळे गैरआदिवासींमध्ये व विशेषत: मोठा समूह असलेल्या ओबीसी प्रवर्गात सातत्याने नाराजीचा सूर दिसून येतो. ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील पदे तरी ओबीसींना द्यावी, अशी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची मागणी असते.

त्याअनुषंगाने भाजपने (एक अपवाद वगळता) आतापर्यंत गैरआदिवासी व्यक्तीची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. परिणामी ओबीसी समाज काँग्रेसपासून दुरावत जाऊन भाजपसोबत जुळला. हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने मागील वेळी ओबीसी प्रवर्गातील महेंद्र ब्राम्हणवाडे यांची नियुक्ती केली. परंतु आता पुन्हा आदिवासी समाजातील विश्वजित कोवासे यांची नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसशी जुळलेला ओबीसी समाज काँग्रेसपासून दुरावण्याची भीती काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT