

Bus overturns Gadchiroli
गडचिरोली : गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोलीनजीकच्या मुरखळा- नवेगावच्या वळणावर उलटल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ख्वाजा शहाबुद्धीन ( वय ५८, रा.देसाईगंज) , शिवांश स्वप्नील नवघरे (वय ७ महिने, रा. गडचिरोली) व लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार (वय ५५, रा.नवरगाव, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
गुरूवारी (दि.२१) सकाळी एमएच १४ बीटी-०७४० क्रमांकाची गडचिरोली-उमरखेड ही बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. मूल मार्गावरील मुरखळा-नवेगावला पोहचताच तेथील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. अपघातामुळे प्रवाशांनी एकच टाहो फोडला. आवाज ऐकून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही पोहचले. सर्वांनी प्रवाशांना बाहेर काढले.
त्यानंतर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. तेथे उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. माहिती मिळताच आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉ.नरोटे यांनी जखमींची विचारपूस केली.
जखमींमध्ये धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे आणि ज्योती अविनाश पाल (सर्व रा.गोकुळनगर, गडचिरोली), श्रीहरी खडकर आणि बेबीबाई श्रीहरी खळकर (दोघे. रा. रामनगर, गडचिरोली), चैतन्य मारुती माडेवार, तानिया मारुती माडेवार, वैशाली मारुती माडेवार, रूपाली खनके, ललिता यशवंत खनके, ऋषभ नीळकंठ खडके, सचिन शामराव वाळके (सर्व रा.चंद्रपूर), जयश्री सचिन वरभे, सचिन शामराव वरभे, जयश्री खनके (सर्व रा.वरोरा जि. चंद्रपूर), रत्नाकर दादाजी राऊत, पार्थ गणेश राऊत (दोघेही रा.मांगलीबूज), मंगला संजय कळसकर (रा.नांदगाव फाटा ता. सावली जि.चंद्रपूर),
भूषण नरेश दुर्गेवार (रा.सिंदेवाही जि.चंद्रपूर), चालक रोहित देशमुख (रा.अकोला), वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे (सर्व रा.वणी जि. यवतमाळ), श्वेता स्वप्निल नवघडे (रा.गडचिरोली), डॉ.गणेश जैन (रा.त्रिमूर्ती चौक, गडचिरोली), सुमन नामदेव कत्तलवार (गडचिरोली),व्यंकट नरेश ढगे (नवेगाव ता.गडचिरोली),अश्विनी लक्ष्मण तोरपे ( रा.कांदोळी ता.कुरखेडा), किशोर कुमाजी गावतुरे (रा.कारवाफा ता. धानोरा), गौरव यशवंतराव कुमरे (रा.गोंदिया) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.