ZP Gadchiroli New Building
गडचिरोली : जिल्ह्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा परिषदेला विविध प्रशासकीय व सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी विसापूर आणि सोनापूर येथील एकूण १२.७५ हेक्टर (सुमारे ३१ एकर) शासकीय जमीन महसूल विभागाने मंजूर केली आहे.
ही जमीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे वर्ग करण्यात येणार आहे. जमीन दोन वेगवेगळ्या भागात असून विसापूरमध्ये स.नं. ३४३/१ मधील २.७१ हेक्टर, तर सोनापूर येथील स.नं. १३५/१ मधील १०.०४ हेक्टर अशी एकूण १२.७५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.
ही जमीन भोगवटा मूल्यरहित आणि महसूलमुक्त किंमतीने मंजूर करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. शासनाने ही जमीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेला प्रशासकीय किंवा सार्वजनिक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या प्रलंबित प्रकल्पांना आता वेग मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.