

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकत सत्ता प्रस्थापित केली. गडचिरोलीत प्रणोती निंबोरकर, आरमोरीत रुपेश पुणेकर, तर देसाईगंजमध्ये लता सुंदरकर विजयी झाल्या.
गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ॲड.प्रणोती निंबोरकर ४ हजार ८१९ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा पराभव केला. प्रणोती निंबोरकर यांना ११ हजार ७६२, तर अश्विनी नैताम यांना ६ हजार ९२३ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार प्राचार्य कविता पोरेड्डीवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
देसाईगंज नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या लता सुंदरकर यांनी काँग्रेसच्या वनिता नाकतोडे यांचा ५१६ मतांनी पराभव केला. सुंदरकर यांना ६६४४, तर नाकतोडे यांना ६०२८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नीता गुरु २६५० मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
आरमोरी नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे रुपेश पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयकुमार मेश्राम यांचा १९०४ मतांनी पराभव केला. पुणेकर यांना ५५२८, तर मेश्राम यांना ३६२४ मते मिळाली. काँग्रेसचे प्रशांत सोमकुंवर हे ३४५० मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
गडचिरोली नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदाच्या एकूण २७ जागांपैकी भाजपने १५, काँग्रेसने ६, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ५ जागा जिंकल्या. एका जागेवर परिवर्तन पॅनलचे बाळू टेंभुर्णे विजयी झाले. आरमोरी नगर परिषदेत एकूण २० जागांपैकी भाजपने १५, काँग्रेसने ४ तर शिवसेना शिंदे गटाने एका जागेवर विजय मिळविला. देसाईगंज नगर परिषदेत एकूण २१ जागांपैकी भाजपने १२, काँग्रेसने ७, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने २ जागा जिंकल्या. प्रथमच आरमोरी नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाने, तर देसाईगंजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खाते उघडले आहे.