यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने बनावट कर्ज वाटप व अन्य प्रकरणात सहभागी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. महागाव तालुक्यातील बनावट कर्ज घोटाळा आणि आर्णी शाखेतील गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
प्रकाश राठोड, अशोक राठोड आणि विजय गवई, अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे आहे. महागाव तालुक्यातील हिवरा शाखेशी संलग्न चिलगव्हाण सोसायटीत घोटाळा उघडकीस आला होता. मयताच्या नावावर कर्ज उचलण्यात आले होते. याप्रकरणी तक्रारीनंतर बँकेने चौकशी केली. चौकशी समितीने यात प्रकाश राठोड आणि विजय राठोड यांच्यावर ठपका ठेवला. आता या दोघांना बँकेने बडतर्फ केले आहे.
जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतही घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणीही बँकेने चौकशी केली. या शाखेतील विजय गवई यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद मिरगे यांनी सोमवारी (दि.८) या तिघांच्या बडतर्फीचे आदेश निर्गमित केले. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता दिग्रस शाखेतील घोटाळा प्रकरणात कुणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच आर्थिक गुन्हे शाखेकडून फौजदारी प्रकरणात तपास केला जात आहे.
हेही वाचा;