नागपूर: पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरसह नागपूर जिल्ह्यांमध्येही सोन्याच्या धातूची खाणी (Gold Mines In Nagpur)असण्याची शक्यता पडताळली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही माहिती दिल्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली. मात्र, जीएसआयने खूप आधीच याविषयीचा अहवाल दिला असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले हा प्रश्नच आहे. विदर्भाच्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिज संपत्ती आढळते. मात्र, आता नागपूर जिल्ह्यात सोन्याच्या धातूचा साठाही दडल्याचा दावा जीएसआयने केला आहे.
चंद्रपूरला सोन्याच्या खाणी (Gold Mines In Nagpur) असल्याची चर्चा सुरू असतानाच नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. फार पूर्वीच्या सर्वेक्षण आणि अहवालात जिल्ह्याच्या पश्चिम ब्लॉकमध्ये भिवापूर तालुक्यातील परसोडीच्या परिसरात सोन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.
नागपूर जिल्ह्यात परसोडीसह किटाळी, मूरपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे सोन्याचा साठा असल्याचे जीएसआयच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. भिवापूर परिसरातही सोन्याचे साठे असण्याची शक्यता आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. या भागात खोदकाम करण्याचा सल्ला जीएसआयने राज्य सरकारकडे अहवालाद्वारे दिला होता. मात्र, प्रमाण कमी असल्याने या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
विशेष म्हणजे, जीएसआयने नागपूर विभागात इतर मौल्यवान धातूंचेही साठे असल्याचे या अहवालात नमूद केले होते. विशेष म्हणजे परसोडीच्याच परिसरात तांब्याचेही साठे आहेत. यासह कुही, खोबना परिसरात मोठ्या प्रमाणात टंगस्टनचे साठे असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातच रानबोरी, भावनेरी भागात झिंक धातूचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली बेल्टमध्ये निकेल, कोबाल्ट, क्रोमाइट, प्लॅटिनम या गटातील धातूंचे मुबलक साठे आहेत. देशात बस्तर खोरे हे मौल्यवान धातूंसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाचा गडचिरोली, भंडारा व नागपूरचाही प्रदेश या खोऱ्यात येतो. त्यामुळे जीएसआयने सर्वेक्षण केलेल्या भागात पुन्हा सर्वेक्षण आणि खोदकाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अर्थातच यातून उद्योगांच्या बाबतीत मागे पडलेल्या विदर्भाचे नशीब बदलेल, अशी भाबडी आशा अनेकांना आहे.
हेही वाचलंत का ?