नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाला आपली स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यातून ते दुसऱ्यांवर टीका करतात. काँग्रेसने खरेतर पहिले आपले घर वाचवावे कारण त्यांचे घर खूप कच्चे झाले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात केली.
कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात अध्यक्ष बावनकुळे यांच्या पुढाकाराने आजपासून अन्नछत्र सुरु झाले. यानिमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमध्ये त्यांच्याच केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वावर देखील आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देश व राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस हे बुडणारे जहाज वाटत आहे. त्यामुळे या जहाजात बसायला कुणीही तयार नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. काँग्रेसला स्वतःचे घर सांभाळता येत नसताना ते दुसऱ्यांवर टीका करायला निघाले आहेत, असेही ते म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले सत्यजीत तांबे यांनी अद्याप आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही. ते आमच्याकडे आले तर आमचे केंद्रीय व राज्य संसदीय मंडळ त्यावर अंतिम निर्णय घेईल, असे सांगताना आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपात जाणार नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे, याकडे लक्ष वेधले असता आगामी काळच ते ठरवेल, असे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीला २०२४ मध्ये उमेदवार मिळणार नाही, असा दावा पुन्हा एकदा केला.
.हेही वाचा